Crime news : माळेगावात कोयत्यांचा थरार ; तिघांवर जीवघेणा हल्ला ! पेट्रोल पंपावर गप्पा मारताना टोळक्याचा हल्ला; ‘जिवंत सोडणार नाही’ म्हणत सपासप वार !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी !
माळेगाव : (ता. बारामती ) येथे पूर्वीचे भांडण सोडविल्याचा राग मनात धरून सशस्त्र टोळक्याने तिघांवर लोखंडी कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना माळेगाव बु. (ता. बारामती) येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात सोमवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संदीप दत्तात्रय जगताप (वय ४६), अनिकेत उदयसिंह धुमाळ (वय २७) आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर (वय २९) हे तिघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी संदीप जगताप यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे यांच्यासह अन्य सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जगताप हे आपल्या मित्रांसह तावरे पेट्रोल पंप परिसरात गप्पा मारत बसले होते. यावेळी पूर्वीच्या भांडणात मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचा राग मनात धरून आरोपींचे टोळके तेथे आले. त्यांच्या हातात धारदार लोखंडी कोयते होते.
आरोपींनी ‘तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत तिघांवर कोयत्यांनी सपासप वार केले. तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिक जमा होत असल्याचे पाहून आरोपींनी ‘तुमच्याकडे बघून घेतो’, अशी धमकी देत मोटारसायकलीवरून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमींवर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना संदीप जगताप यांनी शुद्धीत असताना पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार पटारे (ब. नं. १८४७) यांनी काम पाहिले.

To Top