सुपे : बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील शेरीचीवाडी येथे चुलत सासू-सुनेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. घराच्या ओसरीवर झोपलेल्या दोन ज्येष्ठ महिलांवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. एकाच वेळी दोघींची हत्या झाल्याने संपूर्ण परिसर हादरला असून, हत्येमागील नेमके कारण काय? याचा तपास पोलिसांसमोर आव्हान ठरला आहे.
इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) अशी मृत महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २८) सायंकाळी घराशेजारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर कुटुंबीय घरी परतले. त्यानंतर इंदुमती लडकत आणि कृष्णाबाई लडकत या घराच्या ओसरीवर झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने दोघींवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा गळा चिरला. सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मृत इंदुमती लडकत यांचा मुलगा गणेश मारुती लडकत हे बारामती पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सिक पथक तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे मिळविण्याचा प्रयत्न केला.
चोरीचा उद्देश नसल्याने तपासाला वेगळे वळण
विशेष म्हणजे, प्राथमिक माहितीनुसार ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे दिसून येत नाही. मृत महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या सुरक्षित असून, घरातील कपाटातील वस्तूही चोरीस गेल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे दोन ज्येष्ठ महिलांची एकाच वेळी हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हल्लेखोर कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, या दुहेरी हत्याकांडाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि हल्लेखोरापर्यंत पोलीस कसे पोहोचतात, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

