मोरगांव प्रतिनिधी :
बारामती तालुक्यातील तरडोली येथे नवनाथ भोसले या युवकाचा भरधाव गाडीने ठोस दिल्याने दि. 9 रोजी जागीच मृत्यू झाला होता. यापूर्वी तरडोली गाव व परिसरातील 15 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याने तरडोली गावातील ग्रामस्थांनी आज पुणे बारामती या मार्गावर रस्ता रोको करण्यात आला.
राज्य मार्गाची नोंद असलेल्या जेजुरी - बारामती या रस्त्यावरील केवळ तरडोली या गावात गतीरोधक नसल्याने गेल्या दहा वर्षात लहान मोठे पन्नास पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये पंधरापेक्षा अधिक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे तरडोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत पत्रव्यवहाराने कळविले होते. मात्र याबाबत कुठलीही उपाययोजना झाली नव्हती.दि.9 रोजी येथील नवनाथ भोसले याचा भरधाव गाडीने ठोस दिल्याने जागीच मृत्यू झाला होता. नवनाथ हा घरातील एकुलता एक कर्ता पुरुष होता .यामुळे नवनाथचे कुटुंब उघडे पडले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य हनुमंत हंबीर भापकर याच्या मार्गदर्शनाखाली आज तरडोली येथे रस्ता रोको केला होता. यावेळी नवनाथ भोसले यांचे चुलत बंधू चंद्रकांत भोसले, त्यांच्या भगिनी सुध्दा या रास्तारोको मध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच मा. सरपंच विद्या भापकर, महेंद्र तांबे, सागर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष बारामती तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर गाडे, विनायक गाडे, अनिल कदम , सतीश गायकवाड, सर्जेराव गाडे, विजय भोसले, संदीप सपकाळ , शिवसेनेचे परेश भापकर, संजय भापकर, भालेराव भोसले, आदी ग्रामस्थ बहुसंख्येने जमा झाले होते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोळी, सहाय्यक फौजदार वाघोले,पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, तुषार जैनक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावरून ग्रामस्थ जोपर्यंत गतीरोधक होत नाही तोपर्यंत हटण्यास नकार देत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घोडके यांनी ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारून पुढील उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रथमतः रस्त्यावरील तीव्र वळण व इतर बाबत नामदर्शक पाटी, एलइडी दिवे तात्काळ लावणार असून 22 जानेवारी नंतर राष्ट्रीय सायकल स्पर्धा झाल्यानंतर गतीरोधक बसविण्याचे आश्वासन दिले . यानंतर हा जनआक्रोश कमी होऊन रस्ता रोको थांबवण्यात आला.

