लोणी भापकर : पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रंजना अरविंद गोलांडे (वय ५९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लोणी भापकरसह बारामती तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
रंजना गोलांडे यांनी आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मावळ तालुक्यातून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर बारामती तालुक्यातील लोणी भापकर, शिंदेमळा, बाबुर्डी तसेच पळशी येथील करे वस्ती शाळेत त्यांनी सेवा बजावली. करे वस्ती शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना त्या सुमारे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्या.
विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आणि शिस्तीसोबत मायेची वागणूक देणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या विशेष आवडत्या शिक्षिका म्हणून परिचित होत्या.
*दहा वर्षांपूर्वी मुलाच्या निधनाचा आघात*
गोलांडे कुटुंबावर यापूर्वीही मोठे दुःख कोसळले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या २२ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच रंजना गोलांडे यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
*सात वर्षीय अमित झाला आईच्या मायेपासून पोरका*
रंजना गोलांडे यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, दीर, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सेवानिवृत्त कृषी अधिकारी नेमाजी गोलांडे हे त्यांचे चुलत सासरे, तर मुर्टी केंद्राचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अरविंद गोलांडे हे त्यांचे पती होत. लोणी भापकर गावचे पोलीस पाटील संजय गोलांडे हे त्यांचे दीर आहेत. तर पुरंदर तालुक्यातील राख येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आरती गोलांडे-महांगरे या त्यांच्या कन्या होत.
मात्र या दुःखद घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे अवघ्या सात वर्षांचा चिमुकला अमित गोलांडे आपल्या आईच्या मायेपासून पोरका झाला आहे. आईच्या निधनाची जाणीव होत असलेल्या या कोवळ्या वयात अमितवर मातृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रंजना गोलांडे यांच्या आकस्मिक निधनाने एक कर्तव्यदक्ष शिक्षिका, प्रेमळ मुख्याध्यापिका आणि कुटुंबाचा आधारवड गमावल्याची भावना नातेवाईक, माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
.............

