Crime news : बायकोच उठली नवऱ्याच्या मुळावर !गुंगीचे औषध देऊन बॅटने मारहाण; फरशीने बंद करून जीवे मारण्याचा प्रयत्न ! बारामतीत खळबळ; सासऱ्याच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपी पत्नीला अटक, १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन ! 
बारामती : पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने गुंगीचे औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केल्यानंतर बॅटने मारहाण करण्यात आली. त्यानंतर घरातील हॉलच्या गॅलरीत चौकटीचा कट्टा बांधून त्यात बेशुद्ध अवस्थेत झोपवून फरशीने बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी प्रकाश कन्होबा जगताप (वय ७१, व्यवसाय शेती, रा. ढाकळे, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३३३/२०२६, बीएनएस कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, कसबा-जामदार रोड, इंद्रप्रस्थ सोसायटी, बारामती येथील फ्लॅटमध्ये फिर्यादी यांचा मुलगा प्रविण प्रकाश जगताप राहत आहे. त्यांची पत्नी शर्मिला प्रविण जगताप हिने प्रविण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोणते तरी औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांना बॅटने मारहाण केली.
पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने घरातील हॉलच्या गॅलरीत चौकटीचा कट्टा बांधून त्यात प्रविण यांना बेशुद्ध अवस्थेत झोपविण्यात आले. त्यानंतर चौकटीचा कट्टा फरशीने बंद करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत प्रविण प्रकाश जगताप जखमी झाले असून, त्यांचे वडील प्रकाश जगताप यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पत्नी शर्मिला प्रविण जगताप हिला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तिला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या घटनेमागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.
..............
To Top