Sosayati news : स्वयंभूनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात ! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून दुर्योधन भापकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी :
सायंबाचीवाडी : स्वयंभूनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, सायंबाचीवाडी या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली.
सभेमध्ये संस्थेच्या मागील वर्षातील विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच संस्थेच्या आगामी कामकाजाबाबत आणि सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थेच्या वतीने मतदान प्रतिनिधी म्हणून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष, माजी नगरसेवक तथा संस्थेचे मार्गदर्शक व सदस्य दुर्योधन (बापू) तुकाराम भापकर यांची ४०० ते ५०० सभासदांच्या आवाजी मतदानाने बिनविरोध निवड करण्यात आली.
दुर्योधन भापकर यांच्या नावाची सूचना संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर पांडुरंग गोलांडे यांनी केली, तर सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा संस्थेचे सदस्य नारायण भापकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सभासदांनी हात उंचावून आवाजी मतदानाने दुर्योधन भापकर यांच्या निवडीस सर्वानुमते मान्यता दिली.
दुर्योधन भापकर यांची मतदान प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी तसेच सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सभेचे विषय वाचन संस्थेचे सचिव अशोक जायपत्रे व सहसचिव मारुती घाडगे यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लोणी भापकर शाखेचे विकास अधिकारी तथा  प्रशासक विक्रम चौगुले होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भापकर, सरपंच जालिंदर भापकर, ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, महिला सदस्य तसेच ४०० ते ५०० सभासद उपस्थित होते.
सभेच्या शेवटी ऋषिकेश भापकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिवस्वयंभू दूध उत्पादक संस्थेतही बिनविरोध निवड
दरम्यान, शिवस्वयंभू दूध उत्पादक संस्थेच्या वतीनेही दुर्योधन (बापू) भापकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदान प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी दुर्योधन भापकर यांच्या नावाची सूचना दिलीप दशरथ घाडगे यांनी मांडली, तर शोभा नामदेव भापकर यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सभासदांनी या निवडीस सर्वानुमते मान्यता दिली.
..........

To Top