Breaking news : सुपेत काळाचा घाला! ट्रकच्या चाकाखाली दुचाकी; भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत ! सुपे–चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात हृदयद्रावक दुर्घटना; एका भावाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याने उपचारादरम्यान सोडला अखेरचा श्वास !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी ! सुपे 
बारामती तालुक्यातील सुपे–चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. मालवाहू ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सुपे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अपघातानंतर सोमनाथ ठोंबरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शुभम यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ मोरगाव येथील शाळेतून दुचाकी (क्र. एमएच ४२ ई १८७८) वरून आपल्या घरी परतत होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अहिल्याबाई चौकातून पुढे वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. त्याचवेळी मोरगावच्या दिशेने भरधाव येणारा मालवाहू ट्रक (क्र. एमएच १० सीआर ४१९९) दुचाकीवरून गेल्याने हा भीषण अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मात्र, या दुर्घटनेने संपूर्ण शेंडगेवाडा व सुपे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
To Top