पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लोणी भापकर - सायंबाचीवाडी येथील श्री भैरवनाथ–सायंबा प्रासादिक दिंडीचे आषाढी वारीनिमित्त मंगळवार, ८ जुलै रोजी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात उत्साहाने प्रस्थान झाले. यंदा दिंडीने अकराव्या वर्षात पदार्पण करत वारकरी परंपरेचा अखंड वारसा जपला. विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
दिंडी प्रस्थानापूर्वी श्री भैरवनाथ व सायंबा महाराजांच्या मंदिरात महापूजा, आरती आणि विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय रामकृष्ण हरी" या अखंड नामघोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
यंदाच्या दिंडीत सुमारे दीडशे वारकरी सहभागी झाले असून, महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ वारकरी मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी झाले आहेत. दिंडी मार्गावर शिस्त, सेवा आणि भक्तीभाव जपत वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करीत आहेत.
दिंडीचे प्रमुख ह.भ.प. बाळासाहेब महाराज झणझणे, दादा महाराज भापकर, महेंद्र बारवकर, सचिन मदने आणि दादा सकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत पुष्पवृष्टी करून भावपूर्ण निरोप दिला.
श्री भैरवनाथ–सायंबा प्रासादिक दिंडी ही गेल्या अकरा वर्षांपासून अखंडपणे पंढरपूर वारीची परंपरा जपत आहे. भक्ती, समता, सेवा आणि संत परंपरेचे संस्कार जपणारी ही दिंडी लोणी भापकर व सायबांचीवाडी गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक बनली असून, दरवर्षी वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद या दिंडीची लोकप्रियता अधोरेखित करीत आहे.
...............

