Baramati news : हनुमंत भापकर यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश; जिरायत भागाच्या प्रश्नांवर लढण्याची भूमिका ! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन, बारामतीत भगवा फडकविण्याचा निर्धार !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी : 
बारामती, प्रतिनिधी : बारामती तालुक्याचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवास संपवत पुन्हा एकदा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भगवा झेंडा स्वीकारून शिवबंधन बांधत त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, जिल्हाप्रमुख संजय काळे, बारामती विधानसभा संपर्कप्रमुख आदिनाथ कोठाडिया तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
हनुमंत भापकर यांनी २०११ मध्ये जिरायत भागातील शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा या उद्देशाने तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नाझरे धरणाची उंची, खोली आणि रुंदी वाढविणे, तसेच जिरायत भागासाठी सिंचनाच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याबाबत त्यावेळी आश्वासने मिळाली होती. मात्र, अपेक्षित विकासकामे प्रत्यक्षात न झाल्याने आपण नाराज झालो आणि पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेतल्याचे भापकर यांनी स्पष्ट केले.
"पुरंदर उपसा सिंचन योजनेची केवळ मर्यादित दुरुस्ती झाली. मात्र जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत पाण्याच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. कऱ्हा-नीरा नदी जोड प्रकल्प मंजूर असला तरी त्याचा लाभ सर्व जिरायत भागाला मिळणार नाही. बंद पाइपलाइनद्वारे मर्यादित गावांनाच पाणी मिळणार असून उर्वरित शेतकरी वंचित राहणार आहेत," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जिरायत भाग पाणी परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपण सातत्याने बारामाही सिंचनाची मागणी करत आलो आहोत. सहाव्या टप्प्यात बारामतीच्या जिरायत भागाचा समावेश असल्याने शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागते आणि अनेकदा हाताशी आलेली पिके पाण्याअभावी जळून जातात, असेही त्यांनी सांगितले.
भापकर म्हणाले, "अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात समन्वय राहिला नाही. त्यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. माझा राजकीय जन्म शिवसेनेत झाला असून, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवून काम करण्यासाठी शिवसेनाच योग्य व्यासपीठ आहे."
बारामती तालुक्यात पोलीस, महसूल, कृषी, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती तसेच घरकुल व शौचालय योजनांमध्ये मनमानी व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, गोरगरीब आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणार असल्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
भापकर यांनी यापूर्वी शिवसेनेचे बारामती तालुकाप्रमुख म्हणून सलग आठ वर्षे काम केले असून विविध पक्षीय जबाबदाऱ्यांसह तब्बल १७ वर्षांचा संघटनात्मक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तसेच महावितरण समिती, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती, दुष्काळ निवारण समिती आदी विविध पदांवर काम केल्याचा अनुभवही त्यांनी नमूद केला.
"पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून बारामती विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार," असा निर्धार हनुमंत भापकर यांनी यावेळी व्यक्त केला.

To Top