School news : विलास आबा भापकर मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम; १०० अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश-बूट, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ! दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सलग २० वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम; दहावीतील सात, बारावीतील तीन गुणवंतांसह 'स्वरर्गीयअशोक पांडेकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार' प्रदान !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी | 
लोणी भापकर (ता. बारामती) ग्रामीण जिरायती भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने विलास आबा भापकर मित्र मंडळाच्या वतीने लोणी भापकर येथे स्तुत्य शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे दानशूर व्यक्तींच्या आर्थिक योगदानातून हा उपक्रम मित्रमंडळ गेल्या सलग २० वर्षांपासून सातत्याने राबवत असून, ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला या उपक्रमामुळे मोलाची प्रेरणा व आधार मिळत आहे.
यंदाही या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व बूटांचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह आदर्श विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पडवळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष शेठ बिनावत  आणि निलेश शेठ चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  बक्षिसे व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, लोणी भापकर येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या शुभम नामदेव ठोंबरे, द्वितीय अथर्व विनोद भापकर, तृतीय कु. सायली हनुमंत जगदाळे, चतुर्थ प्रथमेश संतोष नवगण आणि पाचवा कु. आदिती विजय पाटोळे यांचा गौरव करण्यात आला. तसेच लोणी भापकर गावातील विद्यार्थी बाहेरगावी शिक्षण घेऊन उल्लेखनीय यश संपादन करणारे रितेश राजेंद्र भापकर व कु. हर्षदा दत्तात्रय भापकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. रेश्मा मोहन मासाळ, द्वितीय कु. धनश्री नानासो मासाळ आणि तृतीय कु. समीक्षा दीपक जाधव या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती, आदर्श वर्तन व सर्वांगीण गुणवत्तेबद्दलचा 'स्वर्गीय अशोक पांडेकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार' कु. श्वेता तानाजी मासाळ हिला प्रदान करण्यात आला.
 यावेळी मान्यवरांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत गेली दोन दशके हा उपक्रम अखंडपणे राबविणाऱ्या विलास आबा भापकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
  या कार्यक्रमास बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भापकर, माजी सरपंच सुरेश भापकर, विजय बारवकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दिलीप जगदाळे, विलास आबा भापकर मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास भापकर, बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष दादा कडाळे, भैरवनाथ सोसायटीचे संचालक गोविंद भापकर, भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन रमेश भापकर, स्वयंभू नगर सोसायटीचे माजी संचालक भीमराव पवार, ग्रामपंचायत सदस्य आबा ठोंबरे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संदीप जगताप, दादा जाधवराव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संजय भापकर, न्यू इंग्लिश स्कूलचे माजी पर्यवेक्षक त्रिंबक भापकर, शिक्षक ताराचंद भापकर, भूमिपुत्र पतसंस्थेचे सचिव विजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन सकाटे यांच्यासह पालक दादा भापकर, नामदेव ठोंबरे, उमेश पाटोळे, संतोष नवगण, बाळासाहेब गायकवाड तसेच ग्रामस्थ, पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्रमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींनी विशेष परिश्रम घेतले.

To Top