Puraskar news : स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’साठी पत्रकार काशिनाथ पिंगळे यांची निवड !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पत्रकारिता क्षेत्रातून पत्रकार काशिनाथ पिंगळे यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
पत्रकार काशिनाथ पिंगळे हे गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी आणि लोकाभिमुख पत्रकारिता करत आहेत. दै. पुढारी तसेच डिजिटल महाराष्ट्र न्यूज या माध्यमांतून त्यांनी ग्रामीण भागातील विविध प्रश्न प्रभावीपणे समाजासमोर मांडत जनजागृतीचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने त्यांची पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड केली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि लोकसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा कामिनीताई राजे भोसले-ताकवले यांनी दिली.
पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
To Top