भाग : १
विजय गोलांडे – न्यूज स्टेट सेवन
.......,..........................
जून महिना संपून जुलैची सुरुवात झाली तरी राज्यातील अनेक भागांसह पुणे जिल्हा आणि बारामती तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र जवळपास कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी याच काळात हिरवाईने नटलेले शिवार यंदा मात्र ओसाड दिसत असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
खरीप हंगामाची सुरुवात वेळेत होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण करून बियाणे, खते व औषधे खरेदी केली. काहींनी पहिल्या पावसानंतर पेरणीही केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवण धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी बियाणे जमिनीतच सुकण्याची भीती निर्माण झाली असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
बारामती तालुक्यातील जिरायती भागात बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असते. मात्र यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे पेरण्या रखडल्या असून अनेक शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहत आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
केवळ पिकांचाच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम दिसू लागले आहेत. ट्रॅक्टर चालक, मजूर, बियाणे व खत विक्रेते, कृषी सेवा केंद्रे यांच्याही व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे. शेतात कामे नसल्याने ग्रामीण भागातील रोजगारावरही संकटाची चाहूल लागली आहे.
हवामानातील बदल, वाढते तापमान आणि पावसाचे बदलते स्वरूप यामुळे शेती दिवसेंदिवस अधिक अनिश्चित बनत आहे. शेतकरी आर्थिक जोखीम पत्करून शेती करीत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचे नियोजन कोलमडत आहे. वेळेत आणि समाधानकारक पाऊस न झाल्यास यंदाचा खरीप हंगाम मोठ्या प्रमाणावर धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या गावागावांतील विहिरी, ओढे आणि शिवारातील जमीन कोरडी पडलेली असून धुळीचे लोट संभाव्य दुष्काळाची चाहूल देत आहेत. आणखी काही दिवस पावसाचा खंड कायम राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि शेतीचे मोठे नुकसान अशा अनेक समस्या एकाच वेळी उभ्या राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
(क्रमशः)
उद्या भाग २ : कोरडी तळी, आटलेल्या विहिरी; पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांत संघर्ष.

