Mati Upasa news : माळवाडी-लोणीत रात्रीच्या अंधारात माती उपशाचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई ! तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाची हालचाल; परवानग्या, रॉयल्टी आणि प्रत्यक्ष पाहणीबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी : 
माळवाडी (ता. बारामती) : बारामती तालुक्यातील माळवाडी-लोणी परिसरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या संशयित माती उपसा आणि वाहतुकीमुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गट क्रमांक 843, 844, 989, 587, 663, 694 व 700 या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत जेसीबी, पोकलेन आणि हायवा वाहनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी माती उपसा सुरू असून शेकडो ब्रास मातीची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र या कामासाठी आवश्यक असलेल्या रॉयल्टी, पर्यावरणीय मंजुरी, उत्खनन परवाना आणि वाहतूक परवाने घेण्यात आले आहेत का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महसूल प्रशासन झोपेत की जाणूनबुजून दुर्लक्ष?
माळवाडी-लोणी परिसरात सुरू असलेला हा प्रकार महसूल विभागाच्या निदर्शनास नसावा, यावर ग्रामस्थांचा विश्वास बसत नाही. रात्रभर सुरू असलेली हायवा वाहनांची वर्दळ, उत्खनन यंत्रांचा आवाज आणि रस्त्यांवरील धुळीचे साम्राज्य पाहता संबंधित यंत्रणांना याची माहिती नसणे अशक्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात मंडल अधिकारी (सर्कल) संतोष नलावडे यांच्या भूमिकेबाबतही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. परिसरात सुरू असलेल्या उत्खननाबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा दोन दिवस प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महसूल विभागाची अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही.
* परवानग्या आहेत का? प्रशासनाने खुलासा करावा
माती उपसा करण्यासाठी शासनाच्या विविध नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. उत्खननासाठी वैध परवानगी, रॉयल्टी भरणा, पर्यावरणीय मंजुरी, वाहतूक परवाना आणि प्रत्येक वाहनाकडे वैध रॉयल्टी पास असणे आवश्यक असते. संबंधित गटांमध्ये सुरू असलेल्या कामासाठी या सर्व अटींची पूर्तता झाली आहे का, याबाबत प्रशासनाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच उत्खननाची खोली किती आहे, महसूल विभागाने पंचनामा केला आहे का, पर्यावरण कर भरला आहे का, वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
*रस्त्यांची दुरवस्था, धुळीचा त्रास वाढला
माती वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ग्रामीण रस्त्यांचीही दुरवस्था होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
*संयुक्त पाहणीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि पर्यावरण विभागाने संयुक्त पाहणी करावी. संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जाहीर करावी. जर कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळून आला, तर संबंधितांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
ग्रामस्थांचे सवाल...
उत्खननासाठी वैध परवानगी आहे का?
रॉयल्टी भरली आहे का?
पर्यावरणीय मंजुरी घेतली आहे का?
वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वैध पास आहेत का?
रात्रीच्या वेळीच काम का सुरू असते?
महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमधून बोलले जात आहेत.
यामुळे आता महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.......

To Top