वडगाव निंबाळकर पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत ₹८ लाख किंमतीचा चोरीचा हायवा टिपर हस्तगत केला असून संभाजीनगर जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईमुळे वाहनचोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी रात्री ८ ते २३ जुलै रोजी सकाळी ९ या कालावधीत मौजे मुढाळे (ता. बारामती) येथील माळशिकारे यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावरून हायवा टिपर चोरीस गेला होता. याप्रकरणी २३ जुलै रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४६/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तातडीने तपास पथक तयार केले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी वाळुंज एमआयडीसी (छत्रपती संभाजीनगर) येथे सापळा रचून चोरीचा हायवा टिपर जप्त केला.
या कारवाईत राहुल विठ्ठल कराळे (वय ३१, रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि आदित्य रमेश कराळे (वय २५, रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत दोघांनी मिळून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून एकूण ₹८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भागवत पाटील करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार भागवत पाटील, महेश पन्हाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड तसेच पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले आणि विकास येटाळे यांच्या पथकाने पार पाडली.

