Crime news : लोणी भापकरमध्ये शाळकरी विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न?; चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल ! दत्त मंदिर परिसरातील खळबळजनक घटना; वर्षभरात आणखी तीन मुलींना अडवून पळविण्याचा प्रयत्न झाल्याचा पालकांचा दावा, तपासाची व्याप्ती वाढली !

Vijay Golande


न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी | लोणी भापकर
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे सोमवारी (दि. २०) सकाळी शाळेत सायकलवरून जात असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळविण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सायकलवरून शाळेकडे जात होती. लोणी भापकर येथील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनातील चार अनोळखी इसमांपैकी दोघांनी तिची सायकल अडवून तिला जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थिनीने धाडस दाखवत स्वतःची सुटका केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी एपीआय जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड (ब.क्र. ९६०) अधिक तपास करीत आहेत.
वर्षभरात आणखी तीन मुलींना अडविण्याचा प्रयत्न; पालकांचा दावा
दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांसह काही स्थानिक पालकांनी सांगितल्यानुसार, गेल्या वर्षभरात लोणी भापकर परिसरात आणखी तीन शाळकरी मुलींना अडवून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्या घटनांबाबत अधिकृत पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे या माहितीचीही पोलीस पडताळणी सुरू असून तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
या घटनेतील संशयित व्यक्ती अथवा राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनाबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी तातडीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
एका शाळकरी विद्यार्थिनीला पळविण्याच्या प्रयत्नाची नोंद झाल्यानंतर आणि वर्षभरात आणखी तीन मुलींना अडविण्याचा प्रयत्न झाल्याचा पालकांनी दावा केल्याने लोणी भापकर परिसरात पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संशयितांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

To Top