Uposhan news : सायंबाचीवाडी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा; १५ ऑगस्टपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण ! ओढ्यांच्या सरकारी हद्दी कायम करणे, ई-पीक पाहणीतील अडचणी दूर करणे व पाणंद रस्ते खुले करण्याच्या मागण्या; वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही नसल्याचा आरोप !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
मौजे सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील ओढ्यांच्या सरकारी नोंदीनुसार हद्द कायम करणे, ई-पीक पाहणीदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करणे तसेच बंद झालेले पाणंद रस्ते खुले करणे या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा आरोप करत १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बारामती येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सायंबाचीवाडीने दिला आहे.
सरपंच जालिंदर विष्णु भापकर यांच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित प्रश्नांबाबत २९ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार, बारामती यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आले होते. तसेच २७ मार्च २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडेही स्वतंत्र निवेदन देऊन अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, ओढ्यांच्या हद्दी व पाणंद रस्त्यांबाबत वाद वाढत असल्याने विकासकामांवरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात, उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट : प्रमुख मागण्या
ओढ्यांच्या सरकारी नोंदीनुसार हद्द निश्चित करावी.
ई-पीक पाहणीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात.
अतिक्रमणामुळे बंद झालेले पाणंद रस्ते खुले करावेत.
संबंधित प्रकरणांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करावी.
To Top