Police patil : गावच्या कायदा-सुव्यवस्थेचा कणा : पोलीस पाटील नेमका कोण? निवड, पात्रता, कार्यकाल आणि मानधनाचा संपूर्ण आढावा !

Vijay Golande
   विजय गोलांडे, न्यूज स्टेट सेवन ! 
 पुणे जिल्हा महसूल विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रत्येक महसुली गावासाठी एक याप्रमाणे एकूण १,९११ पदे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी साधारण १,१३० पेक्षा जास्त पदांवर पोलीस पाटील कार्यरत आहेत, तर उर्वरित सुमारे ७०० ते ७१२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी वेगवेगळ्या उपविभागांनुसार (उदा. मावळ, मुळशी, भोर इ.) स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवली जाते. 
जिल्ह्यातील काही प्रमुख तालुक्यांमधील पोलीस पाटील पदांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
मावळ तालुकाः एकूण सुमारे ४७ हून अधिक मंजूर पदे.
मुळशी तालुकाः एकूण सुमारे ४९ हून अधिक मंजूर पदे.
इतर ग्रामीण तालुकेः जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर आणि दौंड यांसारख्या मोठ्या तालुक्यांमध्ये गावांच्या संख्येनुसार सर्वाधिक पदे आहेत.
        ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
शासनाने निर्माण केलेली अत्यंत महत्त्वाची व्यवस्था म्हणजे “पोलीस पाटील” पद. गावात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, भांडणे, गुन्हे, अपघात, नैसर्गिक आपत्ती, अवैध धंदे यांची माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पोलीस पाटील करत असतो. गाव आणि पोलीस प्रशासन यांच्यातील तो अधिकृत दुवा मानला जातो.
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि शासन नियमांनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. हे पद निवडणुकीने नसून शासन नियुक्त स्वरूपाचे असते.
पोलीस पाटलाची निवड कशी होते?
पोलीस पाटील पद रिक्त झाल्यानंतर प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर अर्ज मागवले जातात आणि उमेदवारांची पात्रता तपासली जाते.
सामान्य पात्रता
संबंधित गावाचा रहिवासी असणे
भारतीय नागरिक असणे
साधारणपणे दहावी उत्तीर्ण
चांगले चारित्र्य
गुन्हा दाखल नसणे
प्रशासन व पोलिसांचा विश्वासार्ह व्यक्ती वाटणे.
लेखी परीक्षा, मुलाखत किंवा गुणपद्धतीने निवड प्रक्रिया पार पडते. अंतिम नियुक्ती प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने केली जाते.
* पोलीस पाटलाचा कार्यकाल किती असतो?
साधारणपणे पोलीस पाटलाचा कार्यकाल 3 ते ५ वर्षांचा असतो. एकदा निवड झाल्यावर तो सेवानिवृत्ती पर्यंत पदावर राहू शकत नाही. पाच वर्षाने त्याची मुदत संपते. काम समाधानकारक असल्यास फेरनियुक्ती किंवा मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र त्यासाठी पोलीस विभागाचा अहवाल आणि प्रशासनाची मान्यता आवश्यक असते.
*सेवानिवृत्ती वय किती?
६० वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर पोलीस पाटील पदावरून निवृत्त होतात.. काही विशेष परिस्थितीत शासन स्तरावर मुदतवाढ दिली जाऊ शकते.
पोलीस पाटलाला पगार किती मिळतो?
पोलीस पाटील हा कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी नसतो. त्याला शासनाकडून 15 हजार “मानधन” दिले जाते. जिल्हा व शासन निर्णयानुसार हे मानधन बदलू शकते. काही ठिकाणी मासिक मानधनासोबत प्रवास किंवा विशेष कामाचा भत्ता देखील दिला जातो.
(उद्या प्रसिद्ध होणारा भाग २ : या मध्ये वाचा पोलीस पाटलाची कामे, अधिकार आणि त्याच्याकडे असणारे दप्तर.)
To Top