Police patil : पोलीस पाटलाची कामे, अधिकार, कर्तव्य आणि त्याच्याकडे असणारे दप्तर — गावातील “पहिला माहितीदार” कसा काम करतो?

Vijay Golande
विजय गोलांडे : न्यूज स्टेट सेवन 
...............................
पोलीस पाटील हा गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्राथमिक घटक असतो. तो थेट पोलीस अधिकारी नसला तरी गावातील अनेक संवेदनशील बाबींवर त्याची नजर असणे अपेक्षित असते.
पोलीस पाटलाची प्रमुख कामे
गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत
भांडणे, मारामाऱ्या, तंटे यांची माहिती पोलिसांना देणे
संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे व त्याची माहिती देणे.

*पोलीस पाटलाचे अधिकार*
पोलीस पाटील हा पूर्ण अधिकाराचा पोलीस अधिकारी नसतो. त्याला थेट गुन्हा दाखल करण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार नसतो. मात्र त्याच्याकडे पुढील प्रकारचे अधिकार व जबाबदाऱ्या असतात:
संशयित हालचालींबाबत माहिती गोळा करणे
पोलिसांना तात्काळ कळवणे
पंचनामा किंवा तपासावेळी मदत करणे 
गावात शांतता राखण्यासाठी समन्वय राखणे 
*पोलीस पाटलकडे असणारे दप्तर*
पोलीस पाटलाने विविध नोंदी व्यवस्थित ठेवणे आवश्यक असते आणि ती त्याची जबाबदारी असते.

*पोलीस पाटीलांची कर्तव्ये  :
 'म.ग्रा.पो.अ.१९८७' कलम ६ अन्वयेः पोलीस पाटीलांची कर्तव्ये खालील प्रमाणे नमूद आहेत.
१) पोलीस पाटीलाच्या नेमणूकीचे गाव ज्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या हद्‌दीत असेल, त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करणे.
२) कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या मागणीनुसार अहवाल सादर करणे.
३) फौजदारी गुन्हे, गावातील सार्वजनिक आरोग्य व गावातील समुदायांची सर्वसाधारण माहिती कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना कळविणे.
४) पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या कामात शक्यतो सर्व मदत करणे.
५) कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सोपविलेल्या कामांचे (वॉरंट बजावणे इत्यादी) अनुपालन करणे.
६) सार्वजनिक शांतता भंगाची शक्यता कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना कळविणे.
७) गुन्हे प्रतिबंध, सार्वजनिक उपद्रव प्रतिबंध, गुन्हेगारांचा तपास यात यंत्रणेला सहाय्य करणे.
८) शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे.
पोलीस नियम पुस्तिका, १९५९, खंड ३, नियम ४९३ (२) (अ) अन्वये, आजारी प्रवाशांची काळजी घेणे. पोलीस नियम पुस्तिका, १९५९, खंड ३, नियम ४९३ (२) (ब) अन्वये, निखात निधि सापडल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळविणे
निवृत्ती वेतनधारी व्यक्ती मयत झाल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळविणे.
पोलीस नियम पुस्तिका, १९५९, खंड ३, नियम ४९३ (३) अन्वये, नोका भंग झाल्यास खलाशांना व प्रवाशांना मदत करणे.
ज्या गावात तलाठी नाहीत, त्या गावी नैसर्गिक आपत्ती आल्यास मदत करणे आणि सक्षम अधिकाऱ्यास कळविणे.
आणिबाणीच्या काळात गावातील रेल्वेमार्ग, पुल, तारा यांचे संरक्षण करणे.
गावात झालेले अकस्मित मयत, अपघात, संशयास्पद मृत्यू, बेवारस प्रेत, टोळ्या, गुन्हेगार यांची माहिती सक्षम अधिकाऱ्यास कळविणे.
पोलीस पाटलाने गावात रात्रीची गस्त करणे.

"पोलीस पाटीलाचे दप्तर  : 
पोलीस नियम पुस्तिका १९५५, नियम १९७ अन्वये प पाटलाचे हजेरी पुस्तक ठेवले जाते. पोलीस पाटलाने पोलीस नियम पुस्तिका १९५९, अन्वये खालील दप्तर ठेवणे आवश्यक आहे
1) गाव माहिती रजिस्टरः या मध्ये गावाची संपूर्ण माहिती, लोकसंख्या, गावात कोणत्या जाती-धर्माचे लोक राहतात, गावातील देवस्थाने, मंदिरे, मशिदी, चर्च, प्रेक्षणीय स्थळे, उत्सव इत्यादि माहिती ठेवावी.
2) प्रथम खबर रजिस्टरः (पोलीस नियम पुस्तिका १९५९, नियम १२८ अन्वये) है रजिस्टर संबंधित पोलीस ठाण्यामार्फत, सही, शिक्का व अनुक्रमांक टाकून पुरविण्यात येते. यात पोलीस पाटलाने पोलीस ठाण्यास दिलेल्या खबरीची माहिती नोंदवावी. या रजिस्टरमधील पानाचे दोन भाग असतात. दोन पानांच्यामध्ये छिदे पाडलेली असतात ज्यामुळे या दोन भागापैकी एक पान फाडून वेगळे करणे शक्य होते. यातील दोन्ही पानांवर मिळालेली प्रथम खबर लिहून, त्याचा एक आग पोलीस ठाण्यात ‌द्यावयाचा असतो.
3) भटक्या टोळीचे रजिस्टरः (पोलीस नियम पुस्तिका १९५९, नियम १२७ अन्वये) बाहेरच्या गावातून/शेजारच्या जिल्ह्यांतून अथवा अन्य ठिकाणांहून गावात आलेल्या भटक्या टोळ्याची, भिकाऱ्यांची, फकीर, बैरागी, फिरस्ते यांच्याकडे चौकशी करून त्यांची सविस्तर नोंद यात ठेवावी. व याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कळवाचे.
4) आवक-जावक रजिस्टरः यात पोलीस पाटीलांकडे येणारी कागदपत्रे व पोलीस पाटीलाने पाठविलेली कागदपत्रे यांची सविस्तर नौद घ्यावी.
5)हिस्ट्रीशिटर रजिस्टरः यात संबंधित पोलीस ठाण्यात नोंद असणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती व सविस्तर वर्णन ठेवावे यापैकी कोणी गावात आढळल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला कळवावे.
5)गुन्हा व तंटा रजिस्टरः गावात घडणाऱ्या गुन्ह्यांची  व तंट्याची  सविस्तर नोंद या रजिस्टरमध्ये ठेवावी.
6) अकस्मात घटना रजिस्टरः गावात होणारे अकस्मात मृत्यू, आग, अपघात, आत्महत्या यांची सविस्तर नोंद यात ठेवावी. व याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कळवावे.
7) राजकीय हालचाल रजिस्टरः गावातील विविध राजकीय पुढारी, राजकीय पक्ष, नेते, संसद सदस्य, मंत्री, इतर समित्यांवर निवडून जाणाऱ्या व्यक्ती यांची सविस्तर नोद यात ठेवावी. व याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कळवावे.
8) चौकशी रजिस्टरः विविध अधिकाऱ्यांनी, पोलीस पाटलास करावयास सांगितलेल्या चौकशींची माहिती या रजिस्टरमध्ये नोंदवावी.
9) भेट रजिस्टरः गावात शासकीय कामासाठी येणारे शासकीय, निमशासकीय अधिकारी यांची नोंद या रजिस्टरमध्ये करून त्यांची सूचना, अभिप्राय व स्वाक्षरी घ्यावी.
 वरील तरतुदीनुसार , पोलीस पाटीलांची अनेक कर्तव्ये आहेत. परंतु सक्षम नियंत्रणाचा अभाव, प्रशिक्षण न मिळणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटीलांची नियमित सभा न घेणे, त्यांच्या दप्तराची तपासणी न करणे अशा व अन्य अनुषंगिक कारणांमुळे पोलीस पाटीलांवरील प्रशासनाचे व पोलिसांचे नियंत्रण कमी होत आहे.
, वेळोवेळी पोलीस पाटीलांची सभा घेऊन प्रशिक्षण दिल्यास त्यांच्यावर निश्चितच नियंत्रण ठेवता येईल.

To Top