माळेगाव : आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सभासद शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने माळेगाव सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन २०० रुपयांचे कांडे (खोडकी) पेमेंट जाहीर केले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी हिताला प्राधान्य देत हा निर्णय मंजूर करण्यात आला. जून महिन्यात नवीन ऊस लागवडीची तयारी सुरू होत असताना तसेच शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही मदत देण्याची कारखान्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
माळेगाव कारखान्याने गेल्या अनेक वर्षांपासून सभासद शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य देण्याची भूमिका घेतली असून, यंदाचे कांडे पेमेंटही त्याच धोरणाचा भाग असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मागील गळीत हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपीपेक्षा अधिक दर देत कारखान्याने प्रतिटन ३३०० रुपये ऊस बिल अदा केले होते. त्यामुळे शेतकरी हित जपणारा कारखाना म्हणून माळेगावची ओळख अधिक दृढ झाली आहे. आगामी हंगामाच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेले २०० रुपयांचे कांडे पेमेंट शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याची माहिती उपाध्यक्षा सौ. संगीता कोकरे, संचालक बाळासाहेब तावरे, नितीन सातव, विजय तावरे, नितीन शेंडे यांनी दिली.
या बैठकीस उपाध्यक्षा सौ. संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच इतर संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

