Crime news : सुपा पोलिसांचा थरारक पाठलाग; अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या, युवकाची सुखरूप सुटका ! दिवेघाट ते झेंडेवाडीपर्यंत पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; दोन आरोपी गजाआड !

Vijay Golande
 न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी  :
सुपा, दि. ८ : सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या युवकाची अवघ्या काही तासांत सुखरूप सुटका करून दोन अपहरणकर्त्यांना अटक करण्यात सुपा पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, वेगवान हालचाली आणि सिनेस्टाईल पाठलागामुळे ही धाडसी कारवाई यशस्वी ठरली.
दि. ७ जून रोजी ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. दंडवाडी, ता. बारामती) याचे अपहरण झाल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली. लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून ओंकार प्रकाश भोसले व तन्मय सुधीर साळुंखे यांनी त्याला जबरदस्तीने सासवडच्या दिशेने घेऊन गेल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तात्काळ रवाना करण्यात आले. दरम्यान जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलीस ठाण्यांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली.
तपासादरम्यान मिळालेल्या मोबाईल कॉलच्या आधारे संबंधित क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपींचे लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. सासवड पोलिसांच्या मदतीने झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे संशयित स्विफ्ट कारला घेराव घालून अडविण्यात आले.
कारमध्ये ओंकार भोसले (वय २७), तन्मय साळुंखे (वय २०) आणि एक महिला आढळून आली. दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण झालेल्या ऋषिकेश चांदगुडे याचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११९/२०२६ दाखल करण्यात आला असून बीएनएसच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे तसेच त्यांच्या विशेष पथकाने ही धाडसी व यशस्वी कारवाई पार पाडली. सुपा पोलिसांच्या तत्परतेमुळे एका युवकाचे प्राण वाचले असून परिसरात या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
To Top