फलटण तालुक्यातील मुरुम गावावर काळाने अक्षरशः घाला घातला आहे. निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या त्यांच्या लहान भावानेही अखेर मंगळवारी (दि. ९) मध्यरात्री उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेमुळे एकाच कुटुंबातील तिन्ही निष्पाप भावंडांचा दुर्दैवी अंत झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुरुम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (१७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (१५) आणि पवन ज्ञानेश्वर बोडरे (१२) ही तिन्ही भावंडे बारामती तालुक्यातील मुर्टी येथे मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाली होती. मात्र चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आयशर टेम्पोशी समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की सेजल आणि अक्षरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला.
पवनला तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न आणि पवनची जगण्यासाठीची झुंज सुरू असतानाच मंगळवारी रात्री साडेएकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे एका अपघाताने तीन भावंडांचे आयुष्य संपुष्टात आले.
या घटनेने बोडरे कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे. रविवारी शोकाकुल वातावरणात सेजल आणि अक्षरा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच दुःखातून कुटुंब सावरत असतानाच पवनच्या निधनाची बातमी समोर आल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले.
अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांचा लाडका असलेला पवन आता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे. एका क्षणात घडलेल्या या भीषण अपघाताने तीन निष्पाप जीव हिरावून घेतले असून बोडरे कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुरुमसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
..........
"

