Accident news : निरा-मोरगाव मार्गावर मृत्यूचे थैमान; दोन तरुणीं जागीच ठार , चिमुकला जीवन-मरणाच्या झुंजीत !बेफाम आयशरने स्कुटीला १५० फूट फरपटले; संतप्त ग्रामस्थांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले !

Vijay Golande
 न्यूज स्टेट सेवन प्रतिनिधी :
  सोमेश्वरनगर : निरा-मोरगाव राज्य मार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. गुळुंचे गावाजवळ सोमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव आयशर टेम्पोने इलेक्ट्रिक स्कुटीला दिलेल्या जबर धडकेत दोन तरुणींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक चिमुकला गंभीर जखमी झाला. क्षणार्धात घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, भरधाव वेगातील आयशर टेम्पो आणि स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भयानक होती की स्कुटीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला सुमारे दीडशे फूटांपर्यंत फरपटत नेल्याने घटनास्थळ रक्ताने माखले गेले. अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोन तरुणींनी जागीच प्राण सोडले होते.
अपघातानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संतप्त आणि जागरूक ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
प्रशासनाच्या दुर्लक्षाची आणखी किती किंमत?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त ठिकाण अनेक वर्षांपासून धोकादायक बनले असून येथे स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र संबंधित यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत याच ठिकाणी अनेक गंभीर अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
To Top