बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत नागरिकांच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मात्र, महावितरण विभागाच्या बेफिकीर आणि निष्काळजी कारभारामुळे या उपक्रमाला गालबोट लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिबिराचे उद्घाटन बारामती पंचायत समितीचे गटनेते रावसाहेब चोरमले आणि पंचायत समिती सदस्या वैशाली कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार नामदेव काळे, मासाळवाडीचे सरपंच मुरलीधर ठोंबरे, लोणी भापकर चे माजी सरपंच रवींद्र भापकर, जळगावचे माजी सरपंच अशोक कोकणे, माळवाडी लोणीच्या माजी सरपंच मंजुताई लडकत, भिलारवाडीचे माजी सरपंच राजेंद्र जगताप, सुपा परगाणा प्रमुख सुनीलराजे भोसले प्रमुख उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप कडाळे, माळवाडी लोणीचे उपसरपंच गणेश बोरावके, ग्रामपंचायत सदस्य एस. एल. भापकर, मंडल अधिकारी संतोष नलावडे, गाव कामगार तलाठी अंजली गायकवाड, श्रावणी गजभिये, गावकामगार तलाठी संजय बारवकर, सुपा कृषी मंडल अधिकारी बापूराव लोधाडे, कृषी सहाय्यक स्वप्निल गायकवाड, मोरगावचे कृषी सहाय्यक भीमराव लोणकर,पुरवठा विभागाचे सौरभ इंगळे, पोस्ट मास्तर प्रवीण कांबळे, पोस्टमन गोरख काळभोर, पोलीस पाटील संजय गोलांडे, मासाळवाडी चे पोलीस पाटील सुभाष ठोंबरे, महा-ई-सेवा केंद्राचे नितीन पोमणे, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष शेखर खंडागळे, तसेच कोतवाल संपत खोमणे, सचिन भापकर, सुनील मोरे आदी उपस्थित होते.
महसूल, कृषी, पुरवठा, ग्रामविकास, आधार व पोस्ट विभागासह जवळपास सर्वच विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी शिबिरात हजर राहून नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करत होते. सातबारा उतारे, फेरफार, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार दुरुस्ती आणि कृषीविषयक मार्गदर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
मात्र, शासनाच्या या महत्त्वाच्या शिबिराकडे महावितरण विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. शिबिर सुरू झाल्यानंतर बराच वेळ उलटूनही महावितरणचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. एवढेच नव्हे तर, शिबिराच्या ठिकाणी दुपारपर्यंत वीजपुरवठाच खंडित असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम-ढोले, नीरा मार्केट कमिटीचे संचालक भाऊसाहेब गुलदगड शिवसेना वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता लोणकर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कदम-ढोले यांनी दुपारी शिबिराला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणच्या अनुपस्थितीबाबत आणि वीजपुरवठा खंडित असल्याबाबत रोहिणी कदम-ढोले यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
या तक्रारीची तत्काळ दखल घेत रोहिणी कदम-ढोले यांनी शाखा अभियंता सागर शेलार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल कठोर शब्दांत जाब विचारला. “जर गुरुवारी शिबिराला उपस्थित राहणे शक्य नव्हते, तर याबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर दुपारनंतर महावितरणकडून महिला कर्मचाऱ्यांना शिबिरस्थळी पाठविण्यात आले.
महावितरणच्या भोंगळ, बेफिकीर आणि असंवेदनशील कारभारामुळे नागरिक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शासन नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करत असताना महावितरणचा असा निष्काळजी दृष्टिकोन अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
,............

