लोणी भापकर : वाढदिवस म्हटले की केक कापणे, फटाके, जल्लोष आणि हॉटेल वरील दमदार पार्टी असा सर्वसाधारण पद्धतीने साजरा केला जातो. मात्र पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश देत भैरवनाथ एकता ग्रुपचे अध्यक्ष अमोल मदने या तरुण युवकाने आपला वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला.
वाढदिवसानिमित्त त्यांनी वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणी सोडून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असून वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही गरज ओळखून लोणी भापकर (ता. बारामती ) येथील अमोल शहाजी मदने यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
या उपक्रमामुळे चिंकारा हरिण, ससा, मोर, कोल्हा, लांडगा, तरस, काळवीट, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अमोल मदने यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याची ही प्रेरणादायी पद्धत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे अमोल मदने यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मदने, दलित पँथर अध्यक्ष अविनाश बनसोडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज मदने, , दत्तात्रय भापकर, किरण खोमणे, मंगेश गोलांडे, वनरक्षक गोरख भापकर उपस्थित होते.
........

