अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाचे उद्घाटन दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दि. २३ व २४ मे २०२६ रोजी केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे उत्साहात संपन्न होणार आहे. संमेलनास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर तसेच आयबीएन लोकमतचे संपादक मंदार फणसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. रोहन खवटे असून, निमंत्रक म्हणून डॉ. भरत खळदकर तर सहनिमंत्रक म्हणून रामभाऊ नातू कार्यरत आहेत.
संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित नियोजन बैठकीस भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दिपक पवार, सदस्य कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव, तसेच विनायक कांबळे, दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप आणि अरविंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन दिवसीय साहित्य सोहळ्यात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन आणि समारोप समारंभ असे विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.
प्रा. फ. मुं. शिंदे यांची समृद्ध साहित्यसंपदा
प्रा. फ. मुं. शिंदे यांनी गेली पाच दशके मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. ‘अवशेष’, ‘आदिम’, ‘आयुष्य वेचताना’, ‘कालमान’, ‘गणगौळण’, ‘जुलूस’, ‘फकिराचे अभंग’, ‘निरंतर’, ‘निर्वासित नक्षत्र’, ‘प्रार्थना’, ‘मिथक’, ‘लाकडाची फुले’, ‘लोकगाणी’, ‘वृंदगान’, ‘सूर्यमुद्रा’ आणि ‘स्वान्त’ यांसारख्या अनेक गाजलेल्या साहित्यकृती त्यांनी मराठी साहित्यविश्वाला दिल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गीतलेखनही केले आहे.
त्यांच्या नावावर २७ कविता संग्रह, तीन समीक्षासंग्रह, विनोदी गद्यसंग्रह, राजकीय उपहासिका, बुद्धजीवनावरील एकांकिका संग्रह, तसेच हिंदी नाटक **‘क्रांतिबा फुले’**चा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे.
प्रा. शिंदे यांना उत्कृष्ट काव्यलेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार सलग तीन वेळा प्राप्त झाला आहे. याशिवाय समीक्षालेखन, विनोदी लेखन आणि एकांकिका लेखनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पुणे मसापचा कवी यशवंत पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, दमाणी पुरस्कार, प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार हे त्यांना प्राप्त झालेले काही मानाचे पुरस्कार आहेत.
विशेष म्हणजे, सासवड येथे पार पडलेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा समावेश राज्यातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी अभ्यासक्रमात त्यांच्या ‘सूर्यमुद्रा’ या काव्यसंग्रहाचाही समावेश आहे.

