न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्य संख्येची आवश्यक होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी केवळ एक जागेची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसला होती. त्यानंतर राजकीय डावपेच टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अपक्ष सदस्य गळाला लावला आणि सत्तेची मॅजिक फिगर पूर्ण केली आहे.
उपसभापती पद देण्याच्या बदल्यात वडकी गावच्या अपक्ष सदस्या विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 वर पोहोचले आणि हवेली पंचायत समितीवरील सत्तेचा मार्ग मोकळा झाला. आणि सभापतीपदी युवराज काकडे तर उपसभापती पदी विद्या गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर दुसरीकडे भोर पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ही निवडणूक 'ईश्वरी चिठ्ठीवर' निश्चित करण्यात आली.
मात्र, संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने चिठ्ठीद्वारे नशीब आजमावण्यात आले. आणि नशिबाने साथ राष्ट्रवादी काँग्रेसला दिली असून मनिषा कंक सभापती पदी तर उपसभापती म्हणून विशाल कोंडे यांची निवड झाली.
आमदारकी, नगरपरिषद आणि आता पंचायत समिती देखील हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटें यांना सलग तिसरा मोठा धक्का बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांना नशिबाची साथ मिळाल्याचे संपूर्ण पुणे जिल्ह्यात बोलले जात आहे.
.........

