Internet Seva : लोणी भापकर परिसरात मोबाईल व इंटरनेट सेवा तीन ते चार महिन्यांपासून विस्कळीत; नागरिक संतप्त ! सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा !

Vijay Golande
 न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
लोणी भापकर, (ता. बारामती ) येथील जगदाळे वस्ती, भोसले वस्ती शिंदे मळा खासबाग व आंब्याचा मळा परिसरात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
 मोबाईलला पूर्णपणे रेंज मिळत नसल्यामुळे फोन कॉल व्यवस्थित लागत नाहीत. अनेक वेळा कॉल लागल्यानंतरही संभाषण अर्ध्यावरच खंडित होते किंवा समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे स्पष्ट ऐकू येत नाही, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल व इंटरनेट सेवा ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र सेवा सतत विस्कळीत राहत असल्याने ऑनलाइन व्यवहार, शैक्षणिक कामे, व्यावसायिक संपर्क तसेच शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, अभ्यास साहित्य डाउनलोड करणे किंवा शैक्षणिक माहिती मिळविणे यात मोठ्या समस्या निर्माण होत आहेत.
याशिवाय व्यापारी, लघुउद्योगिक तसेच शेतकरी वर्गालाही या समस्येचा फटका बसत आहे. डिजिटल पेमेंट, ऑनलाइन व्यवहार आणि महत्त्वाचे संपर्क साधताना नेटवर्क नसल्यामुळे अनेकदा कामे रखडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आपत्कालीन परिस्थितीतही फोन व्यवस्थित लागत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या समस्येबाबत संबंधित मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र अद्यापपर्यंत या समस्येवर ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील मोबाईल टॉवरची तांत्रिक तपासणी करून नेटवर्क आणि इंटरनेट सेवा तातडीने सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून संबंधित दूरसंचार विभाग आणि मोबाईल सेवा कंपन्यांकडे करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष दिलीप जगदाळे व नागरिकांनी दिला आहे.

To Top