पुणे जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाच्या सभापतीपदासाठी बारामती तालुक्यातील शिर्सूफळ–गुणवडी गटातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कचर शिंदे यांचे नाव पुढे येत असून, यंदा हे पद बारामती तालुक्याला मिळावे, अशी जोरदार मागणी स्थानिक राजकीय व सामाजिक वर्तुळातून होत आहे. विशेष म्हणजे सन 2002 पासून समाजकल्याण विभागाचे सभापतीपद बारामती तालुक्याला मिळालेले नाही. त्यामुळे तब्बल दोन दशकांनंतर बारामतीला या पदाद्वारे प्रतिनिधित्व मिळावे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
शिर्सूफळ–गुणवडी गटातून निवडून आलेल्या शुभांगी कचर शिंदे या स्थानिक पातळीवर सक्रिय आणि जनसंपर्क ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील महिला, वंचित घटक, अनुसूचित जाती-जमाती तसेच मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबविल्या जात असल्याने या पदाला जिल्हा परिषदेत विशेष महत्त्व आहे.
समाजकल्याण विभागातून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहे, मागासवर्गीयांसाठी आर्थिक सहाय्य, अपंग कल्याण योजना तसेच विविध सामाजिक न्यायाच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे या विभागाचे नेतृत्व सक्षम आणि तळागाळाशी जोडलेले असणे गरजेचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर शुभांगी कचर शिंदे यांना संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बारामती तालुक्याने जिल्हा परिषदेत नेहमीच सक्रिय भूमिका बजावली असून, विकासकामांमध्येही या भागाचे योगदान मोठे राहिले आहे. तरीदेखील समाजकल्याण विभागाचे सभापतीपद मागील 22 वर्षांपासून बारामतीला मिळालेले नाही. त्यामुळे यावेळी न्याय्य प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने बारामतीला संधी देणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या सभापतीपदाच्या निवडीकडे जिल्हा परिषदेत तसेच बारामती तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या पदासाठी कोणाची निवड होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत.
.............

