गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडली आहे. एका नामांकित शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे नुकतेच उघड झाले असून, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी तात्काळ आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (रा. वरवंडी, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी साकूर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तिचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या कपड्याच्या दुकानात कामाला जात असल्याने ती अनेकदा घरी एकटीच असायची. कौटुंबिक कारणातून ती काहीशी मानसिक तणावात होती, याच बाबीचा गैरफायदा आरोपी शिक्षक अमोल भोसले याने घेतला. त्याने मुलीशी जवळीक साधून तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले होते. वैद्यकीय तपासणी दरम्यान ती गरोदर असल्याचे निष्पन्न होताच पालकांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी शिक्षकाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (Pocso) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास घारगाव पोलीस करत आहेत.
........

