इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात नव्या ज्वारीची आवक सुरू होताच शेतकऱ्यांना दिलासादायक दर मिळाला आहे. गुरुवारी (दि. २६) भुसार मार्केटमध्ये जयसिंग पाटील यांच्या आडतीवर ज्वारीला प्रति किंटल तब्बल ६ हजार १ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.
गहू व हरभरा शेतमालाचीही आवक सुरू असून भुसार खरेदीसाठी उदय शहा, रविंद्र चंकेश्वरा, संजय गुळवे, नामदेव शिरसट, गोपाळ ढोले, अनिल भंडारी, कोठारी, राहुल देशमुख, कृष्णल मिसाळ हे व्यापारी उपस्थित होते. दरम्यान, मक्याचे दर घसरल्याने बाजार समितीने हमीभाव दराने मका खरेदी केंद्र सुरू केले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शेतमालास चांगला दर मिळावा या उद्देशाने
बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर-अकलूज रोडलगत धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली असून प्रति तास ५ मेट्रिक टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते. बाजार समितीच्या विविध बाजार आवारात अत्याधुनिक भुईकाटा (वे-ब्रिज) सुविधा उपलब्ध असून मुख्य बाजार इंदापूरसह, उपबाजार भिगवण, निमगाव केतकी व वालचंदनगर येथे प्रत्येकी ६० मेट्रिक टन, शिवलीलानगर (इंदापूर-अकलूज रोड) येथे ८० मेट्रिक टन, राशीन रोडलगत बाजार आवारात १०० मेट्रिक टन क्षमतेची २४ तास सेवा सुरू आहे. यावेळी संचालक माजी आमदार यशवंत माने, विलास माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, संदिप पाटील, रुपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे तसेच प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
पारदर्शक व्यवस्था; आधुनिक सुविधा
भुसार, डाळिंब, कांदा, मासळी, पेरू, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट, फुले आदी शेतीमालासाठी मुख्य बाजार इंदापूर तसेच उपबाजार भिगवण, निमगाव केतकी आणि वालचंदनगर बाजारपेठा जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार ठिकाणी शेतमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री, चोख वजनमाप, विक्रीनंतर तात्काळ हिशोबपट्टी आणि रक्कम त्वरीत अदा अशी पारदर्शक व्यवस्था राबविली जात आहे.
......

