मावळ तालुक्यातील शिंदे - घाटेवाडी गावातील दोन तरुण कार्यकर्ते विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना चारचाकी कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच वेळी गावातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले आहे.
राज्यात तिथीनुसार साजरी होत असलेली शिवजयंती आणि दुसरीकडे मावळ तालुक्यात अंगावर रक्ताच्या चिळकांड्या उडवणारी बातमी कानावर आल्याने हृदयाचा ठोकाच चुकला.
विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन शिवभक्त तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये दर्शन बाबू शिंदे (वय १५) आणि ओमकार दत्ता आढळे (वय २३) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील शिंदे घाटेवाडी येथील शिवजयंती तरुण मंडळाचे हे दोन्ही कार्यकर्ते शिवजयंती निमित्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होते.
पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर MH 14- JA 5111 ह्या नंबरच्या शिफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीत मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शिवजयंतीच्या दिवशीच दोन तरुण शिवभक्तांना गमावल्याने शिंदे घाटेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात हे शिवभक्त मध्यरात्री, सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पोहोचले होते. त्यावेळी ते शिवज्योत घेऊन धावत असतानाच विरुद्ध दिशेने येणारी एक कार अचानक दुभाजक ओलांडून त्यांच्या दिशेने आली. कारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत या दोघांना जोरदार धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
...........

