वडगाव–मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी कदम यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचप्रमाणे मोरगाव पंचायत समिती गणातून बाबा चोरमले तसेच वडगाव पंचायत समिती गणातून जितेंद्र पवार यांनीही विजय संपादन केला आहे.
या तिन्ही उमेदवारांच्या विजयामुळे वडगाव–मोरगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजयानंतर समर्थकांनी अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे विजयी मिरवणूक न काढता एकमेकांना शुभेच्छा देत गड आला पण सिंह गेला अशा भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री यांच्या अकाली निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण वडगाव–मोरगाव परिसरात शोकाकुल आणि भावनिक वातावरण होते. अनेक मतदारांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आठवणी होत्या. मतदानाच्या माध्यमातूनच आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची मानवंदना देण्याची संधी मिळाल्याची भावना मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आली.
सामान्य नागरिकांपासून ज्येष्ठ मतदारांपर्यंत सर्वांनी मतदान करताना केवळ उमेदवार नव्हे, तर उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला आणि जनतेशी असलेल्या नात्याला कौल दिल्याचे चित्र दिसून आले. ही निवडणूक म्हणजे राजकीय प्रक्रिया न राहता, जनतेने आपल्या नेत्याला दिलेली भावनिक श्रद्धांजली ठरली, असे मत अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
या भावनिक लाटेचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला असून, विजय हा केवळ उमेदवारांचा नसून तो जनतेच्या नात्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
........

