लोणीभापकर, ता. बारामती येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणीभापकर येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निरोप समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कोकरे उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य संदीप जगताप, निवृत्त मुख्याध्यापक संजय भापकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मनोज साठे तसेच ताराचंद भापकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राजेंद्र कोकरे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचा संदेश दिला. “शिक्षण हीच खरी संपत्ती असून, प्रामाणिक प्रयत्न केल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना, “शाळेत प्रवेश घेताना मनात भीती होती; मात्र आज शाळा सोडताना शाळेविषयी व शिक्षकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. या वेळी वातावरण भावनिक झाले होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी जगदाळे, खजिनदार त्र्यंबक भापकर, संजय कुंभार, बापू ठोंबरे, ताराचंद भापकर, लता भापकर, सीमा भामे, सुजाता सुतार यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार फरांदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक मोहन कदम यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्नेहभोजन देण्यात आले. आनंद, उत्साह आणि विरहाच्या भावनांनी भारलेल्या वातावरणात समारंभाची सांगता करण्यात आली.
............
,

