Kalsharohan : मासाळवाडीत भैरवनाथ- जोगेश्वरी मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा भक्तिभावात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती !

Vijay Golande
न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी : 
मासाळवाडी (ता. बारामती ) येथे  गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ- जोगेश्वरी व ज्योतिबा देवाचे मंदिर 1 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आले आहे. या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या कळसाचे विधिवत पूजन करून कलशारोहण सोहळा अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. ग्रामस्थ, देणगीदार आणि मंदिर समिती यांच्या सहकार्याने साकारलेले हे भव्य काम पूर्ण झाल्यानंतर कळसारोहणाचा सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या आरास, विद्युत रोषणाई आणि पारंपरिक तोरणांनी सजविण्यात आला होता. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोहळ्याची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. त्यानंतर वेदपाठींच्या मंत्रोच्चारात गणेशपूजन, कलशपूजन, हवन व महाअभिषेक करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात श्री. 108 महंत सुंदर गिरी महाराज, श्री सेवागिरी मठाधिपती संस्थान पुसेगाव यांच्या हस्ते व प्रमुख महंत  पोपटगिरी गोसावी, कुंडलगिरी गोसावी, मंगळगिरी गोसावी,तुकाराम गोसावी, बालयोगी पांडुरंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्णकलश मंदिराच्या शिखरावर प्रतिष्ठापित करण्यात आला. “भैरवनाथ महाराज की जय” ज्योतिबाच्या नावाने चांगभलं च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याची चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक मंडळ, जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. गावचे सरपंच मुरलीधर ठोंबरे यांनी आपल्या भाषणात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे कौतुक केले व धार्मिक एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे, देणगीदारांचे, स्वयंसेवकांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या भव्य कलशारोहण सोहळ्यामुळे गावात धार्मिक व सामाजिक एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
.......
..

To Top