बारामती प्रतिनिधी :
बारामती तालुक्याच्या विकासाची पुढील दिशा ठरवणारी जिल्हा परिषद निवडणूक असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
कान्हेरी ता. बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, “बारामती तालुक्याने विकासाच्या बाबतीत कायम आघाडी घेतली आहे. ही निवडणूक केवळ पदांसाठी नसून पुढील पाच वर्षांचा विकास ठरवणारी आहे. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.”
पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व ग्रामीण विकास या विषयांना जिल्हा परिषदेत प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सुशिक्षित, सक्षम, काम करणारे आणि विकासाभिमुख प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नाराज असलेल्यांना सोमेश्वर कारखाना, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, बारामती सहकारी बँक, दूध संघ, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघात स्थान देण्याचा प्रयत्न केला जाईल.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

