केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन ही केवळ एका नेत्याची नव्हे, तर संपूर्ण पक्षाच्या कुटुंबप्रमुखाचीच अचानक झालेली एक वेदनादायक एक्झिट ठरली आहे. या दुर्दैवी घटनेने राज्यभरातील कोट्यवधी समर्थक, कार्यकर्ते आणि शुभचिंतक अक्षरशः स्तब्ध झाले असून, प्रत्येकाच्या मनात “हे असं अचानक व्हावं का?” असा प्रश्न घोंगावत आहे.
या शोक सभेला ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अपघाती निधनाच्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत लोणी भापकर येथे आयोजित शोकसभेत अश्रू, आठवणी आणि न संपणारी हुरहूर यांचा संगम पाहायला मिळाला. सभास्थळी दिवंगत अजित पवारांचे छायाचित्र हार- फुलांनी सजवण्यात आले होते; मात्र त्या फुलांपेक्षा उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू अधिक बोलके होते. अनेक कार्यकर्त्यांना भावना आवरता न आल्याने डोळे पुसताना दिसत होते.
दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले तेव्हा संपूर्ण परिसरात एक अस्वस्थ शांतता पसरली होती. त्या शांततेत दडलेले दुःख शब्दांत मांडणे अशक्य होते. वक्त्यांनी भाषण करताना अनेकदा गळा आवरला; काहींचे शब्द अश्रूंमध्येच विरून गेले. “ते आमच्यासाठी फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, तर संकटात धीर देणारे पालक होते,” अशी भावना व्यक्त करताना अनेकांची मने गहिवरून आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पक्ष, समाज आणि देशासाठी दिला. सामान्य कार्यकर्त्याच्या वेदना ते स्वतःच्या वेदना समजत आणि त्याच आत्मीयतेने त्यावर उपाय शोधत. त्यांचे अपघाती जाणे म्हणजे विचारांची मशाल अचानक विझल्यासारखे असल्याची भावना यावेळी वारंवार व्यक्त करण्यात आली.
अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणा, विश्वास आणि आशेचा आधार होते. आज तो आधार अचानक निखळल्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी आपल्यावरच असल्याची जाणीव शोकसभेत उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती.
शोकसभेच्या समारोपावेळी, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने दिवंगत नेत्याला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे विचार, त्यांची तत्त्वे आणि त्यांचे कार्य सदैव मार्गदर्शक राहील, अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी “नेतृत्व गेले, पण त्यांच्या आठवणी कायम राहतील अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली.

