बारामती : येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही यादी घोषित करण्यात आली. या यादीत अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध गटांसाठी पक्षाने उमेदवार निश्चित केले असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सामाजिक समतोल व कार्यक्षमतेचा विचार करून उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची युती केली आहे. त्याचबरोबर इतर पक्षांना उमेदवारीत स्थान दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पुढीलप्रमाणे : सुपा गट : पल्लवी प्रमोद खेत्रे, सुपा गण : उज्ज्वला पोपट खैरे, कान्हऱ्हाटी गण : श्यामल वाबळे, गुणवडी गट : शुभांगी कचर शिंदे, शिर्सुफळ गण : अनिकेत बाळासाहेब गावडे (भाजप), गुणवडी गण : शुभांगी आगवणे, पणदरे गट : मंगेश प्रतापराव जगताप, पणदरे गण : किरण रावसाहेब तावरे, मुढाळे गण : वैशाली कोकणे, वडगाव निंबाळकर गट : रोहिणी संदीप कदम (ढोले), वडगाव निंबाळकर गण : जितेंद्र पवार, मोरगाव गण : रावसाहेब चोरमले, निंबूत गट : करण संभाजीराव खलाटे, निंबूत गण : दिग्विजय जगताप, कांबळेश्वर गण : आशा विठ्ठल वायाळ, निरावागज गट : शिवानी अभिजीत देवकाते, निरावागज गण : नितीन काकडे, डोर्लेवाडी गण: राजश्री टकले.
दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला वेग आला असून, लवकरच प्रचार फेऱ्या, बैठका व जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

