न्यूज स्टेट 7 प्रतिनिधी :
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील बाळासो सिताराम वाघ यांच्या मालकीच्या मनोज डेअरी फार्मवरील एका उच्च प्रतीच्या गाईला तब्बल २ लाख ५१ हजार रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाल्याने पशुपालक व दुग्धव्यवसायिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ही गाय NDDB च्या “WALTER 40121” या उत्कृष्ट सिमेनपासून तयार झालेली असून तिची दूध उत्पादन क्षमता अत्यंत उल्लेखनीय आहे.
सदर गाय दररोज ३८ ते ४० लिटर दूध देत असल्याची माहिती मनोज वाघ यांनी दिली. उत्तम वंशपरंपरा, सशक्त बांधा, तसेच भरघोस दूध उत्पादन यामुळे या गाईला मोठी मागणी होती. अखेर या गाईची खरेदी महेश इंगळे यांनी विक्रमी किमतीत केली.
मनोज वाघ यांनी सांगितले की, आधुनिक पद्धतीने संगोपन, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि उच्च प्रतीच्या सिमेनचा वापर यामुळेच अशी दर्जेदार गाय तयार होऊ शकली. NDDB च्या WALTER 40121 सिमेनमुळे दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होत असून भविष्यात दुग्धव्यवसायासाठी ही बाब अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
या व्यवहारामुळे परिसरातील दुग्धव्यवसायिकांना नवी प्रेरणा मिळाली असून वैज्ञानिक पद्धतीने पशुपालन केल्यास दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मनोज डेअरी फार्मच्या या यशामुळे तालुका व जिल्हा पातळीवर दुग्धव्यवसायाचा नावलौकिक वाढला आहे.
...........

