पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आल्याने संघटन बळकटीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
संभाजी होळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून, त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षवाढीसाठी होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीनंतर पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना संभाजी होळकर यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत, तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन,” असे सांगितले.

