लोणी भापकर (ता.बारामती) गावाच्या स्मशानभूमीतून थेट शववाहिनीच पळवून नेण्याचे धाडस अज्ञात चोरट्यांनी केल्याने लोणी भापकर गावात संतापाची लाट उसळली आहे. मृतांचे अंतिमदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी ही वाहिनी चोरीला जाणे म्हणजे गावाच्या संस्कृतीवर, परंपरेवर आणि मानवी संवेदनांवर सरळ प्रहार असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सोयीसाठी एक वर्षापूर्वी एक व दोन वर्षा पूर्वी एक अशा दोन शव वाहिन्यांची ही सुविधा उभी केली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून शववाहिनी गायब असल्याचे आढळताच धक्काच बसला. शववाहिनी चोरीस गेल्याचे उघड झाल्याने ही घटना किती निर्लज्जपणे घडवली गेली हे स्पष्ट होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर यांनी दिली. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे गावाच्या जवळ घडत असताना सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी पोलिसांकडून तातडीची आणि कठोर कारवाईची मागणी केली असून चोरट्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
शववाहिनी चोरीला गेल्याने गावातील अंत्यविधीची व्यवस्था कोलमडून पडली असून आपत्कालीन परिस्थितीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी ही घटना "मानवतेवरचा कलंक" असल्याचे सांगत प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ जबाबदारी घेत घटनेची उकल करावी अशी मागणी बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष दादा कडाळे यांनी केली आहे.
.............

