जेजुरी : जेजुरी येथील श्री खंडोबा गडावर भंडाऱ्याचा अचानक स्फोट झाल्याची घटना आज घडली. या घटनेत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह एकूण 16 जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे गड परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जखमींना तात्काळ जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
निवडून आल्यानंतर खंडोबाच्या पहिल्या पायरीवर भंडारा वाहण्यासाठी नगरसेवक व कार्यकर्ते गेले असता भंडारा वाहत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. यामध्ये अनेकांची दाणादाण उडाली असून धुराचे लोट उसळू लागले.
भंडाऱ्याच्या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे. भाविकांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान भेसळ युक्त भंडाऱ्यामुळे स्फोट झाल्याची चर्चा भाविकामधून व्यक्त होत असून कारवाई करण्याची मागणी होत आहे आहे.
.........

