लोणी भापकर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदाळे वस्ती येथे एक वेगळाच भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांपासून मुलांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या शिक्षिका रुपाली जगताप यांची नुकतीच तालुकाअंतर्गत बदली झाली. या शिक्षकेला निरोप देताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या दहा वर्षांपासून या शाळेत कार्यरत असताना शिक्षिका -विद्यार्थ्यांमध्ये एक घट्ट नातं तयार झालं होतं. निरोपाच्या क्षणी अनेक विद्यार्थ्यांनी डोळे पुसत फुलं देऊन भावनिक निरोप दिला. शाळेत मंथन, प्रज्ञाशोध, मिशन बर्थडे, सांस्कृतिक उपक्रम अशा विविध उपक्रमांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी रुपाली जगताप व त्यांचे पती स्वप्निल जगताप या उभयतांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पोशाख, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना रुपाली जगताप यांनीही सर्वांचे सन्मानाबद्दल आभार मानत सांगितले की या शाळेच्या प्रत्येक भिंतीत मुलांचे प्रेम आहे, आणि ते आमच्यासोबत कायम राहील. तसेच त्यांनी शाळेत केलेल्या कामाची माहिती दिली त्याचबरोबर या कामी मदत करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनोभावे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी बॉटल भेट स्वरूपात दिली, त्याचबरोबर विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना नागवेलीच्या पानाचे रोप भेट दिले आणि शाळेसाठी सरस्वतीची सुंदर मूर्ती भेट दिली.
यावेळी शाळेतील विद्याध्यर्याचे डोळे पाणावले होते. शिक्षिकेला निरोप देताना येथील सगळेच वातावरण भावूक झाले होते. दरम्यान विद्यार्थ्यांनीही शिक्षकांनबद्दल आदर व्यक्त केला. यावेळी शाळेतील अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्याथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचा निरोप घेताना रुपाली जगताप यांना ही गहिवरून आले होते.
यावेळी विद्याथ्यांनीही मनोगतातून शिक्षकेप्रति प्रेम व्यक्त केले.ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदाळे वस्ती येथील शाळेतील शिक्षकेचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी भापकर केंद्राचे केंद्रप्रमुख भाऊसाहेब नाझीरकर तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर उपस्थित होते. यावेळी लोणी भापकरचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रविंद्र भापकर, सेवा निवृत केंद्रप्रमुख अरविंद गोलांडे यांच्यासह लोणी भापकर,केंद्रातील शिक्षक, शिक्षिका आजी-माजी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रेवन्नाथ परकाळे यांनी केले तर आभार दिलीप जगदाळे यांनी मानले.
...............

