लोणी भापकर येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांची जन्माष्टमी उत्साहात, भक्तिभावाने व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. मंगल आरती, अभिषेक, अलंकार पूजन, कीर्तन, भजन, पालखी सोहळा आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवसभर मंदिर परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान या सोहळ्याला महिला व ग्रामस्थांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भैरवनाथ महाराज की जय" च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिमय झाले. सकाळी 10 ते 12 या वेळेत विशाल महाराज इंगळे आळंदी यांनी भैरवनाथांचे महात्म्य या विषयावर कीर्तन सादर केले.
शेवटी रामचंद्र भापकर उंड्री पिसोळी यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थ, युवक मंडळ, महिलाबालक मंडळ व पारंपरिक भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ लोणी भापकर यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
काळ भैरवनाथ जन्माष्टमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ह भ प अंजलीताई महाराज ढवळे, श्रीपादमहाराज जाधव, संजय महाराज वाबळे, गौरीताई महाराज सांगळे, गंगाराम महाराज राऊत, छगन महाराज खडके, दयानंद महाराज व बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहूरकर यांची कीर्तन सेवा झाली. व्यासपीठ चालक म्हणून ह भ प मालनताई महाराज पवार व ह भ प सतीश महाराज खोमणे यांनी काम पाहिले. गायन साथ संतोष महाराज माने व मिरासे महाराज यांनी दिली तर मृदुंग वादक पांडुरंग महाराज शिंदे होते.अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन पारंपारिक भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ लोणी भापकर यांच्यावतीने करण्यात आले.
..........

