अहील्यानगर दि. ११ : "सध्याचा काळात समाज संभ्रमावस्थेतून जात असून अशावेळी साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून निर्भीडपणे लेखन करावे, मानवतावादी मूल्याची जपणूक करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.
मराठी साहित्य मंडळ मुंबई आयोजित सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगर (केडगाव) येथे आयोजन कऱण्यात आले होते त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री यादव बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
श्री यादव म्हणाले, " मराठी भाषा जगवली ती डोंगर खोऱ्यात राहणाऱ्या शेती करणाऱ्या ग्रामीण माणसांनी. शेताच्या बांधावर काम करणाऱ्या समाजाचे दुःख साहित्यात मांडायला हवे, लेखकांनी सभोवतालचे वास्तव साहित्यात मांडणे गरजेचे आहे, सत्याचा शोध घेतलेले साहित्य हे टिकावू असते, मराठी साहित्याला फार मोठी परंपरा आणि विचार आहे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे संत साहित्य समजला दिशा आणि प्रेरणा देणारे आहे ."
आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामीण भागात साहित्य संमेलने व्हायला हवीत. साहित्यातून समाज उभा राहतो. डिजिटल मिडिया च्या काळात वाचन संस्कृती कमी होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी मराठी साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कवी ना घ पांचाळ यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विनायक जाधव, अनिता काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
संमेलनांचे संयोजन नानासाहेब डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अनिता काळे, सुदर्शन धस, आशा शिंदे, भीमराव घोडके, बबनराव खामकर आदींनी केले आहे.सुत्रसंचालन विलास रासकर यांनी केले.

