बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील नायकोबा देवस्थानच्या तीन दिवसांच्या यात्रेस शुक्रवार पासून सुरुवात होत आहे. मेंढपाळांना लागणाऱ्या साहित्यासह घोंगडी, रग या वस्तूंची विक्री समाधानकारक होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, येथील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विकास भालेराव बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याचे पाणी, वीज व मंदिर परिसराची स्वच्छता आदी कामे पूर्ण केल्याची माहिती नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती भाऊसाहेब कांबळे यांनी दिली. तालुक्याच्या पश्चिमेस लोणी भापकर नजीक नायकोबा मंदिर जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. येथे वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. यंदा मार्गशीर्षामधील 3 दिवसांच्या यात्रेस शुक्रवारी सुरुवात होत आहे. शुक्रवारी सायंकाळी श्रींच्या पालखीचा छबिना निघेल. या वेळी हजारो भाविक ढोल ताशाच्या गजरात भंडारा उधळीत रात्र जागून काढतात. गजढोल नृत्य, धनगरी ओव्या हेही या रात्रीचे आकर्षण असते. दुसऱ्या दिवशी शनिवारी नवसपूर्ती व साल जत्रा म्हणून हजारो भाविक कुटुंबासह हजेरी लावतात. यात्राकाळात मेंढरांची लोकर कापण्याच्या कात्री, घोंगड्या यासह रग, ब्लँकेट विक्री करणारी दुकाने थाटली जातात. थंडीत झालेल्या वाढीमुळे ही लोकरीच्या वस्तूंची विक्री समाधानकारक होईल, असे इंदापूर येथील विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय मिठाई, नारळ, खेळणी, फेरीवाले यांच्या व्यवसायात देखील वृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रविवारी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. या कुस्त्यांसाठी राज्यभरातून मल्ल हजेरी लावतात.
...........

