पुणे जिल्ह्यातील बारामती नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सचिन सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप कडून कोण उमेदवार उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना उमेदवारी देण्यात आल्याचे अधिकृत जाहीर केले आहे.
दरम्यान नगरसेवकपदाच्या ४१ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे दिसत आहे.
सचिन सातव हे सध्या बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात बँकेनं कर्ज वसुलीत सातत्य राखले आहे. त्याचबरोबर ठेवीतही वाढ झाली आहे. यापूर्वी त्यांनी बारामती नगरपरिषदेचे गटनेते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. प्रशासकीय कामातील अनुभव लक्षात घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
आजोबा, आई-वडील आणि आता मुलगा होणार नगराध्यक्ष विशेष म्हणजे सचिन सातव यांचे आजोबा धोंडीबा आबाजी सातव उर्फ कारभारी अण्णा यांनी सुरुवातीला नगराध्यक्षपद भूषवले आहे. त्यानंतर सचिन सातव यांचे वडील सदाशिवबापू सातव आणि आई जयश्री सातव यांनीही बारामतीच्या नगराध्यक्षपदी काम केलं असून आता सचिन सातव यांना नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणार आहे.
..........

