लोणी भापकर : येथे दिवाळीच्या निमित्ताने राजे प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक वारशाची उजळणी व विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान जागवणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.
या स्पर्धेत एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. माती, कार्डबोर्ड, नैसर्गिक दगड, कागद, तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून बालकांनी विविध शिवकालीन किल्ल्यांच्या अप्रतिम प्रतिकृती तयार केल्या. शिवनेरी, सिंहगड, प्रचंडगड, जंजिरा, रायगड, राजगड, पुरंदर यांसारख्या किल्ल्यांना विशेष प्रतिसाद मिळाला.परीक्षक म्हणून दादा जाधवराव विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एल भापकर व इतिहास अभ्यासक ओंकार गोलांडे उपस्थित होते. 'ऐतिहासिक अचूकता, कलात्मकता, स्वच्छता आणि संकल्पनेतील नावीन्य' या निकषांवर किल्ल्यांचे परीक्षण झाले.
किल्ले बांधणी स्पर्धेत विजेत्यांमध्ये हर्ष सचिन भापकर, अनुष्का गणेश वाघ, अथर्व राहुल जगताप, श्रावणी बापू भापकर, नक्ष तानाजी कांबळे, अनय अमोल बारवकर असे सहा क्रमांक निवडण्यात आले.
दरम्यान उत्तेजनार्थ शंभुनाथ मधुकर मदने, आयुष मनोज साठे, रजिन मतीन तांबोळी असे तीन क्रमांक निवडण्यात आले.
या प्रसंगी राजे प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सिंहगड दाखवण्यासाठी सहलीचे मोफत आयोजन करण्यात आले होते. राजे प्रतिष्ठानच्या आयोजकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, छत्रपती शिवरायांचे स्वराज्य म्हणजे अभिमानाचा इतिहास. आजचे उपक्रम या पिढीत देशाभिमान रोवतात.
विजेत्यांना मानपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात आली. पालक व नागरिकांनी स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.
.............

