Strong Wind news : अवकाळी वादळाचा कहर : पत्र्याचे शेड कोसळून महिलेचा जागीच मृत्यू; ११ शेळ्या-मेंढ्या दगावल्या !

Vijay Golande
न्यूज स्टेट सेवन  प्रतिनिधी  : 
लोणी भापकर, ता. बारामती : माळवाडी (लोणी) येथील गट क्रमांक ७५५ मध्ये रविवारी (दि. २ ऑगस्ट २०२६) दुपारी साडेचारच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळ व जोरदार वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली. जुन्या व बंद असलेल्या हॉटेलसमोरील पत्र्याचे शेड अचानक कोसळल्याने त्याखाली आसरा घेतलेल्या चार शेळीपालकांपैकी नंदाबाई जनार्दन लडकत (वय ६२, रा. माळवाडी - लडकत मळा) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य तिघेजण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात पशुधनाचीही हानी झाली आहे.
जखमींमध्ये बाळासो अमृता लडकत (वय ७०), प्रल्हाद पांडुरंग लडकत (वय ६५) व मंदा प्रताप फरांदे (वय ५९) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत शेळ्या, मेंढ्या व बोकड यांच्यावरही शेड कोसळल्याने मोठे नुकसान झाले.
पंचनाम्यानुसार मंदा प्रताप फरांदे यांच्या २ मेंढ्या व १ शेळी, बाळासो अमृता लडकत यांच्या १ मेंढी व १ बोकड, प्रल्हाद पांडुरंग लडकत यांच्या ४ मेंढ्या तर नंदाबाई जनार्दन लडकत यांच्या २ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. अशा प्रकारे एकूण ११ शेळ्या, मेंढ्या व बोकड दगावले, तर १० जनावरे जखमी झाली आहेत.
दुर्घटनेची माहिती मिळताच लोणी भापकरचे मंडळ अधिकारी संतोष नलवडे, माळवाडी-लोणीचे तलाठी विकास बारवकर, जळगावचे तलाठी संदीप भांडवलकर तसेच लोणी भापकरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला. यावेळी पळशीचे ग्रामसेवक श्री. घाडगे, मदतनीस सुनील मोरे, शरद मासाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नंदाबाई जनार्दन लडकत या माळवाडी-लोणीच्या सरपंच मंजूताई दीपक लडकत यांच्या सासूबाई होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून लडकत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवकाळी वादळामुळे घडलेल्या या दुर्घटनेने माळवाडी लोणी तसेच लोणी पाटी येथील श्री बबन यदु लोणकर यांच्या ही घराचे छत उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असुन त्यांच्या घराचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी  अशी मागणी वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता लोणकर व सामाजिक कार्यकर्ते मोहन लोणकर यांनी केली आहे.
........
To Top