गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी देवी यांचा पारंपरिक विवाह सोहळा यंदा मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सनई-चौघड्यांच्या मंगल निनादाने आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मासाळवाडी व लोणी भापकर गावात पहाटेपासूनच धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक रांगोळ्यांनी नटलेला दिसत होता. पानिपतच्या रनभूमीवर पराक्रम गाजवणारे सोनजी गोरखुजी भापकर यांचे सातवे वंशज विजयसिंह भापकर- पाटील व दारासिंह भापकर - पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यापासून दुपारी 4.00 वाजता मासाळवाडी येथील मानाच्या काठीने मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीला विशेष आकर्षण लाभले. पारंपरिक वेशभूषेत सजलेले भाविक, लेझीम पथक, ढोल-ताशा पथक आणि सनई-चौघड्यांच्या सुरेल तालावर निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
मासाळवाडीत दुपारी 12.00 वाजता भैरवनाथ - जोगेश्वरी विवाह सोहळा ग्रामजोशी दिपू काका प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तर लोणी भापकरला ग्रामदैवत मंदिराचे पुजारी बाबासाहेब भैरवकर व संजय भैरवकर यांच्या हस्ते श्रीनां जलाभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
भैरवनाथ महाराज की जय आणि “जय जोगेश्वरी माता” च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. विवाह सोहळा संध्याकाळी 6.00 वाजून 40 मिनिटांनी पारंपरिक पद्धतीने, मंत्रोच्चारात आणि विधीवत मंगलाष्टकाचे पठण करत पार पाडला. यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.
या सोहळ्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, पै पाहुणे व यात्रेकरूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मासाळवाडी आणि लोणी भापकर गावातील एकोपा, परंपरेप्रती असलेली निष्ठा आणि सांस्कृतिक जपणूक याचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि तरुणांनी परिश्रम घेतले.
हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता गावच्या एकतेचे, परंपरेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरला.
...................

