लोणी भापकर, ता.बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचा जंगी आखाडा उत्साहात पार पडला. या स्पर्धेत तब्बल 113 मल्लांनी सहभाग नोंदवत मैदान अक्षरशः दणाणून सोडले. गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्त्यांचा आनंद लुटला.
सनई-चौघडा व ताशांच्या गजरात पार पडलेल्या या आखाड्यात लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत विविध कुस्त्या रंगल्या. प्रत्येक कुस्तीमध्ये मल्लांनी जोरदार झुंज देत उपस्थितांची वाहवा मिळवली. मैदानात क्षणोक्षणी रंगत वाढत गेल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
अटीतटीच्या व जोरदार झालेल्या कुस्त्यांमध्ये प्रेक्षक व कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव केला. यामुळे मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येक रोमांचक डावावर टाळ्यांचा कडकडाट होत होता.
कुस्ती आखाड्यातील आकर्षण ठरलेल्या शेवटच्या एक लाख रुपयांच्या मानाच्या कुस्तीत मनीष रायते यांनी उत्कृष्ट डावपेच व ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्धी हनुमंत पुरी याच्यावर मात करत विजय संपादन केला. या थरारक कुस्तीने उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकले.
या मानाच्या कुस्तीचा एक लाख रुपयांचा इनाम महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ओएसडी श्री.जीवन रोहिदास ठोंबरे यांच्या वतीने देण्यात आला. विजेत्या मनीष रायते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त गुरुदेव कांबळे तसेच शेवटच्या कुस्तीसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देणारे जीवन रोहिदास ठोंबरे यांचे वडील श्री रोहिदास ठोंबरे यांचा भैरवनाथ जीर्णोद्धार यात्रा कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या कुस्ती आखाड्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मनापासून आर्थिक सहकार्य करत लोणी भापकर - मासाळवाडी गावचा आखाडा मोठा व्हावा या उद्देशाने सढळ हाताने हातभार लावला. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळेच हा जंगी आखाडा यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना भैरवनाथ जीर्णोद्धार यात्रा कमिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी पंचांनी काम पाहिले. त्यांच्या अचूक व निष्पक्ष निर्णयांमुळे कुस्ती स्पर्धा सुरळीत पार पडली आणि मल्लांनाही न्याय मिळाला.
या जंगी आखाड्याला निवेदक म्हणून प्रताप शिर्के यांनी आपल्या बहारदार, खणखणीत आवाजात विशेष रंगत आणली. त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे प्रत्येक कुस्ती अधिक रोमांचक बनली आणि प्रेक्षक अक्षरशः शेवटपर्यंत खिळून राहिले.
अखेर टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषाच्या वातावरणात हा कुस्ती आखाडा संपन्न झाला. मातीशी नाळ जपणाऱ्या या परंपरेने पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या मनात अभिमान जागवला. मल्लांच्या घामाने भिजलेल्या या आखाड्याने केवळ विजेतेच दिले नाहीत, तर गावातील एकोपा, क्रीडाप्रेम आणि परंपरेचा ठेवा अधिक बळकट केल्याची भावना प्रत्येकाच्या मनात घर करून गेली. अशा जंगी आखाड्यामुळे ग्रामीण क्रीडासंस्कृतीला नवे बळ मिळत असून, भविष्यातही ही परंपरा अधिक जोमाने सुरू राहील, अशी आशा व्यक्त होत आहे.

